गरीबांच्या मुलांचे शिक्षण कसे अडचणीत येईल असा सरकारचा प्रयत्न – अजित पवार

बीड ( पाटोदा ) देशात आज पत्रकार,अधिकारी,महिला आणि युवती सुरक्षित नाहीत. विदयार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला,गुणवत्तेला चांगले दिवस असताना गरीबांच्या मुलांचे शिक्षण कसे अडचणीत येईल असा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केला.

आज बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल यात्रा दाखल झाली. पहिली सभा उस्मानाबादमध्ये झाली त्यानंतर दुपारची सभा पाटोदा येथे पार पडली.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचे बीड जिल्ह्यात भव्य आगमन झाल्यानंतर पाटोदाच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ऊसतोड कामगारांना भाजपाने वा-यावर सोडले, स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचा मतासाठी उपयोग केला मात्र त्यांच्या नावे काढलेले साधे महामंडळ काढले नाही आता त्या ऊसतोड कामगार यांच्या साठी मी काम करून दाखवेल अशी ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

या जाहीर सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विक्रम काळे, आमदार जयदेव गायकवाड, आमदार सतिष चव्हाण, आमदार रामराव वडकुते, आमदार विदया चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, बाळासाहेब आजबे, रेखा फड, महेंद्र गर्जे, मेहबुब शेख, डॉ,नरेंद्र काळे, पाटोदा तालुकाध्यक्ष विश्वभूषण नागरगोजे, रामकृष्ण बांगर आदींसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

या सरकारने राज्याला कंगाल करुन टाकले आहे. कित्येक लाख लोकांची रेशनवरील साखर बंद करुन टाकली आहे. त्यांना सणामध्ये गोडधोड करुन खायलाही सरकारने आडकाठी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मात्र उदयोगपतींना कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना मदत नाही. अडल्या-नडल्या शेतकऱ्यांना सरकार का मदत करत नाही असा सवाल अजित पवार यांनी केला.

डिजिटल आणि कॅशलेसच्या माध्यमातून लोकांना लुटण्याचा प्रयत्न होतोय परंतु ग्रामीण भागातही बाब लक्षात येत नाहीय मात्र सरकारचे हे फसवे धोरण हळूहळू लक्षात येवू लागले आहे. जीएसटी, नोटाबंदी याचा फायदा कुणाला झाला तर कुणालाच नाही हेच उत्तर आहे. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जात आहे. याकडे लक्ष दयायला वेळ सरकारला नाही असेही अजित पवार म्हणाले.

साडेतीन वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. निव्वळ हुकुमशाही, हिटलरशाही सुरु आहे. परंतु ही हुकुमशाही फार काळ टिकत नाही. संघर्ष केल्याशिवाय, बोट वाकडं केल्याशिवाय लोणी मिळत नाही. त्यामुळे मंत्र्यांना फिरणंही कठिण झालं पाहिजे असे काम हल्लाबोलच्या माध्यमातून उभं राहिले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

जनतेच्या पैशाच्या जीवावर सरकार जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करत आहे. जनतेचा पैसा त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे परंतु या सरकारने अक्षरश: कंगाल करण्याचे धोरण सुरु ठेवले आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

या सभेमध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशात परिवर्तनाची लाट आली आहे. खोटी आश्वासने दिलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी जनता तयारीला लागली आहे हे गुजरातच्या निवडणूकीमधून समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केले असून आंदोलनाची ठिणगी आता पडली आहे. त्याचा ज्वालामुखी कसा होईल असा प्रयत्न होवू दया असे आवाहन नवाब मलिक यांनी यावेळी केले.

तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये पाटोदा तालुक्यातील शेतकरी ऊसतोडणीसाठी बाहेर जातो. त्या ऊस कामगारांच्या कल्याणासाठी महामडंळ काढण्यात आले परंतु साडेतीन वर्षात या कामगारांच्या कल्याणासाठी एक रुपयाही आला नाही. आणि या महामंडळाचे परळी येथे कार्यालय असून ते आहे की नाही याचा शोध मी घेतोय परंतु ते मला अदयाप सापडले नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असून तुमच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. ज्यांची कसलीच पत नाहि त्यांचे नाव तरी कशाला घेऊ असा टोला नाव न घेता सुरेश धस यांना लगावला. यावेळी बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे यांची भाषणे झाली.

सभेमध्ये भाजपा युवा अध्यक्ष भाऊसाहेब ससे , सतीश नेमाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांचे बीड जिल्हयात आगमन होताच त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या ताफ्याच्यापुढे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली