अंबरनाथ(गौतम वाघ) – उल्हासनगर परिमंडळ चारमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच उल्हासनगर येथे एका तरुणाची एक दिवसापूर्वी हत्येची घटना ताजी असताना, अंबरनाथ येथील जावसई परिसरातील डोंगराळ भागात एका तरूणाचे मुंडके धडावेगळे करत हत्या झाल्याचे समोर आले आहे.

या हत्येने अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली असून डोंगर परिसरात गुन्ह्यांचे वाढत्या प्रमाणाने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ येथील तीन झाडी या डोंगराळ परिसरात एक महिन्यापूर्वी प्रियकराची हत्या करत तरूणीवर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे या भागातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. तोच तीन झाडी पासून समान अंतरावर असलेल्या जावसई या डोंगराळ भागात एका तरूणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या तरूणाचे मुंडके धडावेगळे करत त्याची हत्या करण्यात आली आहे.

मंगळवारी या भागातील एका व्यक्तीचा मुंडके नसलेल्या व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची तात्काळ अंबरनाथ पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हत्या झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून, ही हत्या एका व्यक्तीचे काम नसून तीन ते चार व्यक्तींने केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचे मुंडके त्याच्या धडापासून काही अंतरावर फेकण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पथक लावत संपूर्ण डोंगराळ भागात शोध घेतला असता, तीन तासानंतर या तरुणाचे मुंडके पोलिसांना सापडले. मात्र ही हत्या तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याने तसेच तरुणाचे शिरही कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे. यावेळी अंबरनाथ पोलिसांसह फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रॅन्चचे पथकही दाखल झाले होते. त्यामुळे ही हत्या कोणी आणि का केली तसेच हत्या झालेला व्यक्ती कोण आहे. याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. या हत्येविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हत्येनंतर पुन्हा अंबरनाथ पश्चिम भागातील डोंगराळ भागातील निर्जन ठिकाणच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.