औरंगाबाद,दि.13 (जिमाका) -औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद जवान किरण पोपटराव थोरात, युनिट 4 एमएलआय, राहणार फकिराबाद वाडी, पो. लाडगाव, ता. वैजापूर यांना जम्मु- कश्मीर कृष्णा घाटी सेक्टर येथे पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये वीरमरण आले होते. आज सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात शोकाकुल वातारवणात त्यांच्यावर फकिराबादवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळी 6:30 वाजता लष्करी अधिकारी यांच्यस‍ह 20 जणांच्या तुकडीसोबत अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव औरंगाबाद छावणी येथील सैन्य दलाच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी या मुळगावी नेण्यात आले. यावेळी त्यांना शासकीय इतमामात 25 इन्प्फंट्री व मराठा लाईट इन्प्फंट्री रेजिमेंटच्या सैनिकी तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

यावेळी  कॅप्टन साकेत शर्मा, मेजर कदम, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. सुभाष झाबंड, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. आरती  सिंह, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, सहायक पोलिस अधिक्षक सोमय्या मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल लांजेवार, पोलिस निरीक्षक अनिरूद्ध्‍ नांदेडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव, सहाय्यक गोरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रतिष्ठीत नागरीक व ग्रामस्थांची उपस्थित होती.  शहीद जवान किरण थोरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.