Connect with us

ब्लाॅग

विश्वासाचा ‘ब्रिज’ कोसळतोय?

Mahabatmi

Published

on

“या सिजनमध्ये एक ब्रिज पडला.आता पुढच्या सिजनमध्ये काय-काय पडेल याची वाट पाहायची “.सीएसटी कडे धावत जाणाऱ्या सामान्यातल्या अतिसामान्य माणसाचे हे विधान.अपघात होऊन चोवीस तासानंतरचे हे वाक्य आपल्याला बरंच काही सांगून जाते.सीएसटी जवळील ‘हिमालय ब्रिज’ घटनेने सहा जणांना गिळले.शेतीचा,आयपीएलचा जसा दरवर्षी हंगाम असतो तसा अपघातांचा हंगाम मुंबईत सुरू होतो.दरवर्षी मुंबईत काहिनाकाही घडतेच.पुढे होणाऱ्या घटनांची भविष्यवाणी करण्यासाठी इथे कोणा ज्योतिषाची गरज लागत नाही. कोणताही मुंबईकर आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलय याचा अंदाज देऊ शकतो.दरवर्षी एखाद्या झोपडपट्टीला लागणारी आग असो किंवा एखादा ब्रिज कोसळणार असो,याचे ठराविक अंदाज मुंबईकरांना आरामात देता येतात.सकाळी घरातून बाहेर पडणारा हा मुंबईकर रेल्वे स्टेशनवर लोकलचे ‘रिटर्नचे’ तिकीट तर काढतो मात्र तो खरंच घरी परतले का? याची त्याच्या घरातल्यांना शाश्वती नसते.देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक हे जीव मुठीत घेऊन लढत असतात.त्यांना परकीयांचा धोका असतो हे ठाऊक असते.मुंबईकरांच्या बाबतीतही तसेच.तेसुद्धा रोज जीव मुठीत घेऊन इकडून-तिकडे पळापळ करत असतात.परंतु इथे त्यांना आपल्याला कोणापासून धोका आहे हे ठाऊक नसते.कोण-कुठला-कधी आपल्या जीवावर उठेल ते सांगणे कठीण आहे.आपली चूक असो वा नसो शेवटी जीव जातो तो जातोच.
सध्याच्या ब्रिज अपघातानंतर अनेकजण बोलण्यास तयार नाहीत.शरमेची बाब म्हणजे अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नाही.अपघाताचे खापर एकमेकांवर ढकलण्यात मात्र सर्वजण नेहमी तयार असतात.महापालिका ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांचे यासंबंधी एक अवाक्षरही नाही.ऑडिट रिपोर्टच्या नावाखाली ही घटना जेवढ्या लवकर दाबता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेची ‘बातमी’ करायला गेलेल्या पत्रकारांनासुद्धा मुंबई महापालिकेच्या गेटमध्येच अडवण्यात आले.त्यामुळे अनेक टीव्ही माध्यमांनी रस्त्यावर उतरून कार्यक्रम केले.पण अशा प्रकारे सर्वच बाजुंनी कोंडी झाली तर जाब नेमका कोणाला विचारायचा?
माणसाची सर्वात चांगली सवय म्हणजे ‘जगणे’.या जगात जगण्याला फार किंमत आहे असे म्हटले जाते.पण अशा अपघातांवर एक नजर टाकली की मरण्याला किती किंमत ते कळते.”अरे जाऊ दे रे मेलो तर सरकारकडून पैसे तरी मिळतील” ,”निदान घरच्यांचे तरी भले होईल”.”अशा घटनांमध्ये आपला नंबर लागला पाहिजे ” अशा स्वरूपाची मते आज तयार होत आहेत. त्यामुळे हे असले विचार किती लाजिरवाणे आहेत याचा आगामी काळात आढावा घ्यायला हवा.सरकार आणि जनतेची खरी ‘युती-आघाडी’ होण्यासाठी विश्वासाचे नाते जपावे लागेल.पण या नात्यांचे ब्रिज असेच कोसळायला लागले तर पुढे घडणारी क्रांती ही जवळच येऊन ठेपलीय एवढे नक्की.

अक्षय दिलीप नाईकधुरे

Advertisement

ब्लाॅग

रिअल लाईफ मुकद्दर का सिकंदर – कादर खान !

Mahabatmi

Published

on

Veteran Bollywood actor Kader Khan dies at 81, Bollywood loses a gem
एक कमालीचा हळवा आणि भावूक सीन अमिताभच्या ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये होता. चिमुरड्या सिकंदरचे आईबाप नसतात. तो यतिम असतो. रामनाथजींच्या (श्रीराम लागू) घरी त्याला काम मिळते. त्यांच्याकडेच घरकामास असलेली फातिमा त्याला आपला मुलगा मानते. रामनाथजींची मुलगी कामना (राखी) हिच्या वाढदिवसाचा सोहळ्यात येण्यापासून सिकंदरला मज्जाव केला जातो. त्याचं तिच्यावर असीम आणि सालस प्रेम असतं. स्वकष्टाच्या कमाईतून आणलेलं बाहुलीचं गिफ्ट तिला देण्यासाठी तो लपून छपून तिच्या घरात शिरतो आणि पकडला जातो. त्याला आणि फातिमाला कामावरून काढलं जातं. त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला जातो. ते रस्त्यावर येतात आणि येथून त्यांच्या आयुष्याची दशा बदलते. आजारी असलेल्या फातिमाचे दैन्यावस्थेच्या हाल अपेष्टांनी निधन होते. कोवळ्या सिकंदरला आपली मुलगी मेहरू हिच्या स्वाधीन करून ती अनंताच्या प्रवासास जाते.

वैफल्यग्रस्त झालेला सिकंदर तिच्या कबरीजवळ बसून राहतो. त्याच कबरस्तानात त्याला एक फकीर भेटतो. दरवेश बाबा त्याचं नाव. तो फकीर सिकंदरमधील सुप्त गुणांना ताडतो आणि त्याच्यातल्या वैषम्यास मात देत त्याचं मनोबल उंचावणारा आशीर्वाद त्याला देतो. तो म्हणतो – “बेटे इस फकीर की एक बात याद रखना. जिंदगी का अगर सही लुफ्त उठाना हैं ना तो मौत से खेलो… सुख में हसते हों तो दुख में कहकहे लगाओ.. जिंदगी का अंदाज बदल जायेगा. बेटे जिंदा हैं वो लोग जो मौत से टकराते हैं. मुर्दों से बदतर हैं वो लोग जो मौत से घबराते हैं.. सुख को ठोकर मार दुख को अपना.. सुख तो बेवफा हैं चंद दिनों के लिये आता हैं और चला जाता हैं.. मगर दुख, दुख तो अपना साथी हैं. अपने साथ रहता हैं.. पोंछ ले आसू, दुख को अपना ले.. अरे तकदीर तेरे कादमों में होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा.. हंस ले बेटा जोर से हस लें … ” कॅमेरा मास्टर मयूरवर स्थिरावतो तो हसू लागतो आणि शॉट मिक्स होत गेटवे ऑफ इंडिया जवळच्या आकाशात उडणारी कबुतरे दिसू लागतात आणि बाईकवरून सुसाट वेगाने जाणारा अमिताभ दिसू लागतो. असा हा सीन सिक्वेन्स होता. वरवर हा एकदम मसाला सीन वाटतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा सीन रिअल लाईफमध्ये घडलेला आहे. हा प्रसंग खुद्द कादर खान यांच्याच आयुष्यात घडला होता. आणि कथेत दाखवलेल्या या प्रसंगाशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात साधर्म्य होतं. (‘रिअल लाईफ मुकद्दर का सिकंदर – कादर खान ! : ले. समीर गायकवाड’)

कादरखाननी स्क्रीनप्ले लिहिलेल्या अनेक सिनेमात एक दृश्य कॉमन दिसतं. नायकाची गरीब आई आजारी पडलेली आहे. वादळवाऱ्याची पावसाळी रात्र आहे. किशोरवयीन नायक सैरभैर होतो आणि आईच्या इलाजासाठी डॉक्टरना आणण्यासाठी कसलीही पर्वा न करता अंधार कापत धावत सुटतो. किंवा हे दृश्य असेही असायचे, तगड्या तरुण नायकाची आई अंथरुणाला खिळून आहे आणि नायकास तिच्या आजाराची माहिती होताच तो डॉक्टरांकडे तिला नेतो. पैशाअभावी तो ते उपचार करू शकणार नाही हे जाणवताच तो कधी डॉक्टरांच्या गचांडीला धरतो तर कधी औषध दुकानदारास दम देतो तर कधी जोरजबरदस्ती दाखवत डॉक्टरांना आपल्या घरी धरून आणतो. हा प्रसंग कादर खान यांच्या कथेत वारंवार येण्याचे कारण म्हणजे ही घटना ते स्वतः प्रत्यक्ष जगले होते. या दाहक अनुभवाच्या होरपळीतून ते कधीच बाहेर येऊ शकले नाहीत.

कादरखान यांनी संवाद कथा लिहिलेल्या बहुतांश चित्रपटातली आई बहुत करून गरीब असून काबाडकष्ट करणारी असे, तिचा पती सोडून गेलेला असे वा ती विधवा तरी असे. तिला तीन चार अपत्ये तरी असत. ज्यांचे पालनपोषण करताना ती आई स्वतः खंगून जाई, झिजून जाई आणि त्यातून ती दुखणेकरी होई. या आईचा मृत्यू हा नायकाच्या काळजाची भळभळती जखम बनून जाई. असा टर्न नसला तर असाही करिष्मा दाखवला जाई की नायकाची मरणासन्न आई त्याने प्रार्थना, दुवा करताच जिवंत होई. कादर खान यांच्या कथेतली आई पुन्हा पुन्हा नवं जीवन जगे, कधी तिला दृष्टी येई, तर तिची गेलेली वाचा येई, कधी तिची स्मृती परत येई, तर कधी तिचं अपंगत्व पुरतं नष्ट होई, ती पहिल्यासारखी ठणठणीत बरी होई हे ठरलेले असे. वारंवार त्यांच्या कथात हा सीन येई कारण हा त्यांच्या वैयक्तिक जीवनातला स्थायीभाव झाला होता. आपल्या आईला त्यांनी ज्या अवस्थेत गमावले त्याचा त्यांच्या मनावर इतका मोठा आघात झाला की वयाच्या ऐंशीव्या वर्षात देखील ते आईची आठवण काढून ढसाढसा रडत. त्यांना नेहमी स्वप्ने पडत की आपली मृत आई जिवंत होऊन आपल्याजवळ आली आहे आणि आपण सुखात आहोत. वास्तवात हा भास असे जो त्यांना नित्य हवाहवासा वाटे. यामुळे त्यांच्या कथांत ही घटना ठरलेली असे. वरील तीनही प्रसंग असे होते की ज्यांना वगळून कादर खान यांच्या जीवनाचा कॅनव्हास रंगणारच नाही.

‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या चित्रपटात कादरखान यांच्या तोंडी एक संवाद आहे – “हमें तो लगता हैं भगवान ने हमें खाली पैदा किया, तकदीर लिखना ही भूल गया !” चित्रपट तद्दन फालतू होता. भूमिका तकलादू आणि विषय दर्जाहीन होता. रिलीजनंतर चित्रपट अपेक्षेनुसार झोपला. पण हा संवाद लक्षात राहिला कारण तो केवळ त्यातल्या पात्राच्या तोंडातला संवाद नव्हता तर कादर खान यांच्या एकंदर आयुष्याचे ते सार होते जे त्यांच्या लेखणीतून नकळत प्रसवले होते.

कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ चा, अफगाणिस्तानच्या काबूलमधला. वडील अब्दुल रहमान कंदहारचे तर आई इक्बाल बेगम आताच्या पाकिस्तानातील बलुच प्रांतातील पस्शीनची. कर्मठ पश्तून काकड जमातीचे हे कुटुंब. फाळणीनंतर या जमातीचे अनेक लोक राजस्थानात स्थलांतरित झाले. कादरना तीन भाऊ होते. पण जन्मानंतर काही काळातच ही सर्व मुले वारली. दरम्यान त्यांच्या आईस वाटू लागले की इथली हवाच आपल्याला मानवत नाहीये आपण जागा बदलून दुसरीकडे जाऊ. नाहीतर हा चौथा मुलगा देखील मरण पावेल. इक्बाल बेगमच्या हट्टापुढे कोणाचे काही चालले नाही. सगळा बाड बिस्तरा घेऊन हे कुटुंब भारतात आले. बरीच भटकंती करून ते मुंबईत आले. ग्रांटरोडच्या झोपडपट्टीतल्या एका झोपडीत त्यांना छप्पर मिळालं. तिथल्या गटार कचऱ्याच्या गलिच्छ वातावरणात ते राहू लागले. दारूअड्डे, जुगार अड्डे, वेश्यावस्ती आणि कत्तलखाने यांचा कोवळ्या कादरच्या मनावर खोल आघात झाला.

रोज होणाऱ्या पशूंच्या कत्तली पाहून पेशाने मौलवी असलेले त्यांचे वडील खूपच अस्वस्थ झाले आणि त्यांनी तिथून निघण्याचं ठरवलं ज्याला त्यांच्या आईचा विरोध होता. यातूनच त्यांच्या आई वडीलांनी परस्परापासून फारकत घेतली. ते विभक्त झाले. यामुळे किशोरवयीन कादरची अवस्था अधिकच दयनीय झाली. त्यांचे वडील आई आणि मुलांना तिथेच झोपडपट्टीच्या नरकात सोडून गेले. एक तरुण सुंदर पठाण स्त्रीने इथं एकट्याने राहणं धोक्याचं होतं हे कादरच्या आईला समजावून सांगण्यासाठी तिच्या माहेरहून तिचे आप्त आले. तिची इच्छा नसूनही केवळ तिच्या व कादरच्या भवितव्यासाठी कादरच्या आजोबांनी व मामूजाननी कादरच्या आईचा दुसरा निकाह लावून दिला. आपल्या आईने दुसरे लग्न लावले याचा कादरना जो धक्का बसला त्याला ते कधीच विसरू शकले नाहीत. ही घटना सांगायची म्हणजे ओठ उसवण्याचा क्रूर अनुभव असे ते म्हणत.

त्यांच्या आईचं आतल्या आत घुस्मटणं सुरु झालं आणि तीळतीळ काळीज तुटणाऱ्या आईला पाहून त्यांचं झुरणं सुरु झालं.कादरना सावत्र पिता मिळाला, पण तो काही कामधंदा न करणारा ऐतखाऊ इसम होता. आईलाच मेहनत करावी लागे. तिच्या कमाईचे पैसे संपले की सावत्र वडील कादरला घरातून हाकलून देत आणि पहिल्या बापाकडून पैसे मागून आणायला सांगत. केवळ एक -दोन रुपये आणण्यासाठी किशोरवयीन कादरना कामाठीपुऱ्याहून खडकला जावं लागे. तिथं जाऊन त्यांच्याकडे याचना करावी लागे, “मला सावत्र वडीलांनी पैसे मागायला पाठवलंय, आमची अवस्था फारच बिकट आहे. काहीही करून मला किमान एखादा रुपया तरी द्या. .. ” त्यांच्याच पोटाचे वांधे असत. गालफडे आत गेलेल्या त्यांच्या तोंडावर चटईवर झोपून तिचे ओरखडे उमटलेले असत, त्यांचे हाल खस्ता होते तरीही ते कुठून तरी उसनवारी करून एखाद दुसरा रुपया कादरच्या हाती ठेवत. त्यावर त्यांची आठवड्याची गुजराण होई. आठवड्यातले तीन दिवस ते जेवत तर उरलेले दिवस उपाशी राहत. कादरखाननी लिहिलेल्या कथांचे दरिद्री, गरीब, फाटक्या कपड्यातले कळकटून गेलेले बालनायक नेहमीच या दशेत का दिसतात याचं उत्तर इथे मिळते. ‘मुकद्दर का सिकंदर’ असो वा ‘लावारिस’ असो, त्यातला बालनायक स्वतःला ‘गंदी नाली के किडे जो जीने के लायक नही..’ असं म्हणवून घेतो ! ही जीवघेणी वेदना त्या नायकांची नव्हती तर ती कादरखान यांचीच होती.

आपल्या आईला कोणतीही कामे करताना व्याकूळ झालेल्या कादरखानना बालवयातच मजदूरीच्या कामास सुरुवात करायची होती पण आईच्या कानी ही गोष्ट जाताच तिने स्वतःची शपथ घालून त्यांना काम सोडायला लावून फक्त शिक्षणाकडे लक्ष देण्याचे वचन घेतले होते. एकदा त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं की, ‘यार तू हे शिक्षण घेतोयस पण याचा काय फायदा होणार ? तू हा नाद सोड आणि आमच्या बरोबर चल. काम कर, पैसे कमव.. फेकून दे ती पुस्तके.. ‘ मित्रांच्या बहकाव्यात आलेल्या कादरखाननी वह्या पुस्तके कोनाड्यात टाकली आणि ते घराबाहेर पडणार तोच त्यांच्या आईने त्यांना अडवले. ती माऊली त्यांना म्हणाली, “बेटा तू मेहनत करून काय होणार आहे ? माझ्या काळजीपायी तू काम करशील. पण त्याने फारतर अन्नाचे चार घास मिळतील मात्र आपली गरिबी कधीच दूर होणार नाही.. तू शिकायला हवंस.. तू शिक आणि मोठा हो मग बघ, आपले दिवस नक्की पालटतील… तोवर या गरिबीच्या पहाडास मी टक्कर देईन, मी कणखरपणे उभी राहीन पण तू कच खाता कामा नये !” आईनं सांगितलेला हा मूलमंत्र ऐकताच कादरच्या रोमरोमात जणू वीज कडाडली. त्यानंतर माघारी फिरलेल्या कादरनी कोनाड्यात टाकलेली पुस्तके उचलली आणि थेट पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काची मागे वळून पाहिले नाही. इस्माइल यूसुफ कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिवाय ते एमएच सैबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिविल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते.

आपल्या पोरासाठी रात्रंदिन खस्ता खाणारी इक्बाल बेगम गेली तो प्रसंग फारच वाईट होता. युवा अवस्थेतले कादर खान कोणत्या तरी नाट्य स्पर्धेत भाग घेऊन परगावाहून घरी आलेले. आई एका पातेल्यात रक्तांच्या उलट्या करत होती, आसपास रक्ताचे थारोळे पसरलेलं ; पातेल्यात साठलेलं रक्त आई मोरीत नेऊन ओतत होती. इतक्यात कादर खान आले आणि त्यांनी आईला तशा अवस्थेत पाहिलं. आईने सांगितलं की, “असंच हे अधून मधून रक्त पडतं पण मी तुला कधी सांगितलं नाही बाळा.. ‘ ते ऐकताच भेदरून गेलेल्या हरिणासारखी अवस्था झाली त्यांची. आईच्या इलाजासाठी डॉक्टरना आणण्यास ते धावत सुटले. डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी आईच्या तपासणीसाठी घरी चलण्याची विनंती केली. डॉक्टरांनी त्यास असमर्थता दर्शवली. त्यांच्या नकाराने सर्द झालेल्या कादरखाननी त्यांना चौदावं रत्न दाखवत जबरदस्तीने घरी आणलं. डॉक्टरांनी त्यांच्या आईला तपासून सांगितलं की त्यांचं देहावसान होऊन गेलंय, आता सारं संपलंय. हा प्रसंग कादरखान यांनी थोडेफार बदल करत आपल्या अनेक चित्रपटात साकारला आणि त्या दुःखाची त्यांनी पुनराभूती घेतली. आईच्या जाण्याचे त्यांना इतके दुःख झाले की ते पुन्हा पुन्हा त्या बालपणीच्या जगात जात. त्यांनी लोकांना आपल्या आईच्या दुःखद मृत्यूची बातमी कळवली तर अनेकांनी त्यांनाच रागे भरले तर काहींनी ती ही चेष्टाच वाटली. कुणी त्यांना गांभीर्याने घेतलेच नाही. त्यांच्या आयुष्यातला या काळातला संघर्ष इतका बुलंद होता की त्यांच्यापुढे नियतीला झुकावं लागलं, पण एका बाजूने त्यांना सिद्धी समृद्धी लाभत असतानाच दुसऱ्या बाजूने ते सतत काही न काही गमावत राहिले. ते स्वतः धगधगता दीपस्तंभ झाले तरीही अंधारलेल्या वाटांनी त्यांची साथ कधी सोडलीच नव्हती एका अनामिक विरह वेदनेने त्यांचा पिच्छा कधीच सोडला नाही. भीती आणि लाचारी या त्यांच्या आयुष्याच्या अविभाज्य बाबी बनल्या होत्या.

अभ्यासाची ओढ असणाऱ्या कादरखानना ओढ होती अभिनयाची. दिवसभर ज्या ज्या लोकांना ते बोलताना वा विविध हावभाव करताना पाहत त्यांची ते नक्कल करत. पण त्यासाठी त्यांच्याकडे जागा नव्हती, एकांत नव्हता आणि सामावून घेईल अशी स्पेसही नव्हती. मग अंधार झाला की ते नजीकच्या कबरस्तानमध्ये जाऊन बसत आणि एकट्याने त्या नकला सादर करत. कलाकारही तेच आणि प्रेक्षकही तेच ! एका रात्री त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाशझोत पडला. जो त्यांना जीवनाची खरी दिशा दाखवून गेला. तो प्रकाश एका वयस्क व्यक्तीच्या हातातील टॉर्चचा होता. खरं तर रात्रीच्या वेळी अकस्मात उजेड आल्याने आधी कादर घाबरून गेलेले. इतक्या रात्री आपण इथं काय करतो, कशी नक्कल करतो याची त्यांनी माहिती दिली. पलीकडून विचारणा झाली की नाटकात काम करणार काय ? तेंव्हा कादरखानना नाटक म्हणजे काय असतं हे देखील ठाऊक नव्हतं ! सुपर टॉकीजच्या शेजारील गल्लीत एक बंगला होता तिथे दुसऱ्या दिवशी येण्याचं आमंत्रण त्यांना मिळालं ! कबरस्तानमधील भेटीचा हाच प्रसंग ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये होता !

सुपर टॉकीजजवळील त्या घरात गेल्यावर त्यांना काही संवाद दिले गेले. कादर खाननी ते संवाद अशा काही अंदाजात म्हणून दाखवले की एखाद्या कसलेल्या नाट्यअभिनेत्याचा भास व्हावा. उपस्थित सगळे थक्क झाले. या नंतर त्यांना नाटकातील भूमिका मिळत गेल्या. ‘मामक आजरा’ हे त्यांचे पहिले नाटक ज्यात त्यांनी राजपुत्राची भूमिका केलेली. त्यांचा अभिनय पाहून अश्रफ खान नामक ते बुजुर्ग व्यक्ती पुढे आले आणि त्यांनी कादरच्या हाती शंभराच्या दोन नोटा ठेवत म्हटलं, “ही बक्षिसी ! आज या केवळ दोन नोटा आहेत पण तू यांना संभाळून ठेव आणि असंच काम कर, एके दिवशी तुझ्याकडे इतक्या नोटा असतील की त्यांची मोजदाद करणं अशक्य होईल ! त्यांनी कादरच्या हाती पैसे ठेवले, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांना दुवाआशीर्वाद दिले..ही बुजुर्ग व्यक्ती त्यांच्या आयुष्यात त्यांना पुन्हा कधीच दिसली नाही की भेटली नाही. या व्यक्तीसोबतचा हा व कबरस्तानमधील भेटीचा प्रसंग मुकद्दर का सिकंदरमध्ये वेगळ्या पद्धतीने एकत्रित करून पेश केला गेला होता !

‘ताश के पत्ते’ नावाचे त्यांचे एक नाटक होते. एकदा विख्यात अभिनेते आगा यांनी त्या नाटकाला हजेरी लावले. ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी ती बाब दिलीपकुमार यांच्या कानावर घातली. या नाटकावर दिलीपकुमार यांनी सिनेमा बनवला तर तो खूप चालेल अशी सूचनाही केली. ती ऐकून दिलीपसाबनी त्यांना भेटायला बोलवलं. दस्तूरखुद्द दिलीपकुमार यांचा निरोप म्हटल्यावर कादरखान हबकून गेले. मग कादर खान यांनी न राहवून दिलीपकुमार यांच्यासाठी तीन अटी घातल्या ज्यामुळे कादरखान यांचे टेन्शन वाढले. दिलीपनी नाटक सुरु होण्याआधी यायचे होते, शिवाय ते संपूर्ण नाटक त्यांनी पाहायचे होते आणि तिसरी अट म्हणजे एकदा नाटक सुरु झाले की उठबस करणे बंद होणार होते. या अटीमुळे दिलीप येणार नाहीत असा कादरखान यांचा समज झालेला. पण झाले उलटेच दिलीपकुमार यांनी त्या अटी मान्य केल्या आणि आश्चर्यचकित होऊन त्या नाटकास आले ! त्यांचा नाटकातील अभिनय पाहून दिलीपकुमार खूप खुश झाले. ते बॅकस्टेजवर गेले आणि त्यांनी कादरना मुबारक बात पेश केली. इतकंच नव्हे तर त्या नाटकात आजोबाची भूमिका करणाऱ्या कादरना त्यांनी आपल्या आगामी ‘बैराग’ या चित्रपटात मोठा रोल देणार असल्याचं घोषित केलं.

दरम्यान दिलीप कुमारनी त्यांचं नाव इंडस्ट्रीत इतर लोकांनाही सुचवलं. त्याच्या जोरावर ‘दाग’, ‘बेनाम’, ‘गुंज’, ‘सगीना’, ‘गुप्तज्ञान’ अशा चित्रपटात छोट्या भूमिका मिळाल्या. काही भूमिका मिळवून देण्यात स्वतः मदत केली. त्यांची भूमिका मिळण्याची धडपड आणि अंगभूत प्रतिभाशक्ती पाहून अमिताभ बच्चन खूप प्रभावित झाले. अमिताभची दुहेरी भूमिका असलेल्या ‘अदालत’मध्ये (१९७६) त्यांनी इन्स्पेक्टर खानच्या रूपाने पहिला मोठा ब्रेक दिला. यामुळेच की काय पण काल रात्री अस्वस्थ झालेल्या अमिताभनी कादरखान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्याचं ट्विट केलंय. त्याचबरोबर प्रकाश मेहरांच्या ‘खून-पसीना’साठीही अमिताभनी पुन्हा एकदा शब्द टाकला. हे दोन्ही सिनेमे एका काही अंतराने रिलीज झाले पण या दोन्हीत कादरखान यांच्या भूमिका परस्परविरोधी होत्या. एकात ते इन्स्पेक्टर होते तर दुसऱ्यात बदमाष ! क्रिटीक्सनी त्यांच्या खलनायकाला अधिक गौरवले त्यामुळे त्यांना खलनायकी भूमिका अधिक मिळाल्या. पहिला ब्रेक मिळाल्यानंतर त्यांचे दिवस बदलत गेले. त्यांची स्वतःची संवाद शैली, विविध कार्यक्रमात वाढलेला वावर यातून ते घडत गेले. अभिनयासोबतच संवाद, कथा, पटकथा लेखन त्यांनी सुरु केलं आणि पाहता पाहता त्यांनी दोन दशके हिंदी सिनेमाचा पडदा आपल्या नावाने व्यापून टाकला.

खलनायकाच्या भूमिका आपण करत असल्याने आपल्या मुलांना शाळेत इतर विद्यार्थी टोमणे मारतात, प्रसंगी हात उचलतात आणि समाजातही लोक नावेच ठेवतात त्यामुळे खलनायकी चौकटीतून त्यांना बाहेर पडायचे होते आणि साऊथकडून आलेल्या गल्लाभरू प्रोड्यूसर्सच्या हाती ते अलगद अडकले. ‘हिम्मतवाला’ आला आणि त्याने कादरखान यांची प्रतिमा तर बदललीच पण खलनायकाची कठोर, क्रूर, निर्दयी, कपटी, जुलमी प्रतिमा मोडत त्याला विनोदाची फर्मास झालर देत त्याचं विद्रुपीकरण केलं. पुढे हे प्रमाण इतके वाढले की खलनायकाचा बट्ट्याबोळ झाला. याला कारण कादरखानच होते ! ‘हिम्मतवाला’च्या आधीच्या पोस्टर्सवर फक्त श्रीदेवी जितेंद्र होते मात्र सिनेमा हिट झाल्याच्या पहिल्या आठवड्यात त्यावर कादरखान यांना छोटीशी जागा मिळाली ही कमाल देखील त्यांचीच होती !

कादरखान यांच्या अभिनयात काही प्रमाणात वाह्यातपणा होता, त्यांनी काही कमालीच्या बाष्कळ भूमिका केल्या. त्यांचा अभिनय विनोदी आणि गंभीर भूमिकात सारखाच खुलला. चरित्र अभिनेता आणि सहायक अभिनेता या टाईमपास कॅरेक्टरमध्ये ते जास्त दिसले. पण त्याहून अधिक त्यांचं संवादलेखन गाजलं. त्यांच्या संवादाचेही दोन भाग करावे लागतील. पूर्वार्धात कादर खान यांनी लिहिलेल्या संवादात चाबूक फटके होते, काळजाला भिडतील असे लक्ष्यभेदी शब्द होते, कठोर वज्रप्रहार करण्यापासून ते दुःख वेदनांच्या सागरात आकंठ बुडवण्यापर्यंतचे परिणाम साधणारे संवाद त्यांनी लिहिले. त्यांच्या कथा पटकथा एका ठराविक पठडीतल्या होत्या पण लोकांना आपल्या वाटाव्यात अशा काही घटनांचा त्यात अंतर्भाव असे. १९७२ ते १९८४ च्या कळातील मुख्यतः ‘रोटी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘परवरिश’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’, ‘लावारिस’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘याराना’, ‘देशप्रेमी’, ‘कुली’, ‘खुद्दार’, ‘शराबी इत्यादी सिनेमातील त्यांचे संवाद, कथा – पटकथा पहिल्या भागात मोडतील अशा होत्या.

तर उत्तरार्ध फारसा चांगला नव्हता. दक्षिणेकडील निर्मात्यांनी जितेंद्रला हाताशी धरून जेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीला एका रिमेकयुगात लोटून दिले त्या काळातील कादर खान यांचे चित्रपट कमालीचे टुकार आणि सत्वहीन होते. पण त्यातला चार्म काहीसा अनोखा होता, त्यात पंचेस होते, त्यात विनोद (?), रोमान्स, ऍक्शन, ट्रॅजेडी आणि हेवी बजेट यांचे कॉम्बीनेशन अचाट होते. यामुळे पब्लिकने हे चित्रपटही डोक्यावर घेतले. ‘काम्याब’, ‘मकसद’, ‘सिंघासन’, ‘होशियार’, ‘दिया और तुफान’, ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘भाई’, ‘आंटी नंबर वन’ असे एकाहून एक रेम्याडोक्याचे हे चित्रपट होते. त्यातही ‘हत्या’, हम’ व ‘जैसी करनी वैसी भरनी’ हे गोविंदा अभिनित चित्रपट आणि रेखाचं पुनरुज्जीवन करून गेलेला ‘खून भरी मांग’ यातल्या खटकेबाज संवाद, थरारक सीन्स, आणि वेगवान कथानक यांच्या आधारावर ते तगून राहिले. के. बापय्या, डी. रामानायडू, ए. नागेश्वर राव आणि कृष्णा या दक्षिणात्य चौकडीने कादर खान यांच्या लेखणीची लय बिघडवली. जोडीला शक्तीकपूर सोबत त्यांनी विनोदाच्या नावाखाली जो आचरटपणा, पांचटपणा केला त्यामुळे ते पोरकट दर्जास गेले. एका श्रेष्ठ प्रतिभावंताचे हे अधःपतन होते. ‘बिना फाटक की रेल्वे लाईन’सारखे फडतूस डायलॉग त्यांनी लोकप्रिय केले.

‘औरों के लिये गुनाह सही हम पिये तो शराब बनती हैं अरे सौ गमोको निचोडने के बाद एक कतरा शराब बनती हैं !’ (नसीब) ‘जिंदगी में लोग मुहब्बत के सहारे जीते हैं मैं आपके नफरत के सहारे जीऊंगा.. ‘, ‘तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कबरस्तान में खतम होती हैं.. ‘ न मौत आती हैं न तुम आती हो लेकीन जोहरा बाई तुम बहुत अच्छा गाती हो… ‘ – (मुकद्दर का सिकंदर) असे अनेक संवाद देता येतील ज्यातून कादर खान यांची प्रतिभा अजमावता येते. जितेंद्रची भूमिका असेलल्या ‘मेरी आवाज सुनो’ (१९८२) आणि जॅकी श्रॉफ – नाना पाटेकर अभिनित ‘अंगार'(१९९३) साठी त्यांना उत्कृष्ठ संवाद लेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’साठी विनोदी अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मिळाला.

कादर खान यांच्या आयुष्यात योगायोग मोठ्या प्रमाणात आढळतात. तीन सुपरस्टार्सनी त्यांना उभं केलं. दिलीपकुमारनी इंडस्ट्रीत आणलं, तर पहिली मोठी भूमिका अमिताभनी मिळवून दिली आणि राजेश खन्नांनी ‘रोटी’ (१९७४)च्या रूपाने पहिली पटकथा लिहून घेतली ! १९९९ सालच्या ‘सूर्यवंशम’, ‘हसीना मान जायेगी’, हिंदुस्तान की कसम’, सिर्फ तुम’ आणि ‘आ अब लौट चले’ या मोठ्या सिनेमांनंतर २००० सालचा ‘धडकन’ हाच अखेरचा हिट सिनेमा ठरला. त्या नंतर त्यांचे अस्तित्व नगण्य राहिले. उगवत्याला सलाम आणि मावळत्याला पाठ दाखवायच्या रिवाजाला इंडस्ट्री पुरेपूर जागली. २०१४ मध्ये त्यांच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली यात काही तरी बिनसले आणि त्यांची प्रकृती वेगाने ढासळू लागली. दुःखद अवस्थेतील त्यांचे फोटो अधून मधून झळकू लागले आणि त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करू लागले. मध्यतंरी रामदेव बाबांच्या पतंजली आश्रमात देखील त्यांनी काही महिने उपचार घेतले पण त्यांच्या मुलांनी त्यांना परत कॅनडाला नेले. आता कळतेय की त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. कदाचित हा त्यांचा अखेरचा संघर्ष असू शकतो. इथे ते सिकंदर होतील की नाही हे अजून कळायचे आहे. ४३ वर्षाच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात अभिनय करणाऱ्या आणि २५० हून अधिक चित्रपटासाठी लेखन करणाऱ्या कादरखान यांना अखेरच्या दोन दशकात काम मिळाले नाही, इंडस्ट्रीने त्यांची साथ सोडली आणि तब्येतीनेही सोबत सोडली.

एंटरटेन्मेंट वेबसाइट ‘स्पॉटबॉय’ला कादर खान यांचा मुलगा सरफराज खानने दिलेल्या माहितीनुसार कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर हा आजार झाला आहे. ज्यामुळे मेंदूद्वारे नियंत्रित होणाऱ्या सर्व हालचालींवर परिणाम झाला आहे. मुलगा आणि सून, सरफराज आणि शाइस्ता यांच्यासोबत ते राहत आहेत. सरफराजच्या सांगण्यानुसार डॉक्टरांच्या टीमचे त्यांच्यावर सतत लक्ष होते. पण श्वसनाला होणाऱ्या त्रासामुळे त्यांना बाइपेप वेंटीलेटरवर ठेवले गेले आहे. कादर खान क्वचितच शुद्धीवर येत आहेत. त्यांनी बोलणे बंद केले आहे. न्यूमोनियाचे लक्षणही आढळून आलेत. कादर खान यांचा मुलगा आणि सून त्यांच्या उपचारांमध्ये कुठलीही कसर शिल्लक सोडत नाहीयेत. पण आता त्यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली आहे. त्यांच्याबाबत आजही अनेक अफवा पसरवल्या जाताहेत, त्यांचे कौटुंबिक सख्य चांगले आहे, आर्थिक परिस्थितीही उत्तम आहे आणि त्यांची देखभालही होते आहे. मात्र नियती त्यांना साथ देत नाहीये हे खरे. त्यांच्या स्वभावास पाहू जाता लाचारीचे जगणे पसंत करण्यापेक्षा ते काही काळ झुंज देऊन मृत्यूशी जुळवून घेतील असे वाटते.

त्यांच्या अम्मीजानला भेटायची आर्त ओढ त्यांना लागली असेल हे वेगळे सांगायला हवे का ? ईश्वर त्यांच्या सर्व इच्छा पुऱ्या करो …

समीर गायकवाड

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in